आजच्या “सकाळ” मधली ही बातमी वाचून हे लिहावेसे वाटले…जे बरेच दिवस मनात होते.

माणसाला छंद, विरंगुळा असावेत. किंबहुना माणसाने छंदांसाठी जगावे असे अनेक लोकांना वाटते. त्यात जास्त करून कलाकार, साहित्यिक यांची संख्या जास्त असते. किंबहुना पु.ल. देशपांडे यांचे त्या अर्थाचे हे वाक्य अनेकदा समाजमाध्यमात फिरत असते.
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” — पु. ल. देशपांडे
जॅान ॲडम्स ह्या जॅार्ज वॅाशिंग्टनच्या समकालीन असलेल्या अमेरिकन राजकीय नेत्याने १७८० साली एका पत्रात पुढील ओळी लिहील्या होत्याः
“I must study politics and war that my sons may have liberty to study mathematics and philosophy. My sons ought to study mathematics and philosophy, geography, natural history, naval architecture, navigation, commerce, and agriculture, in order to give their children a right to study painting, poetry, music, architecture, statuary, tapestry, and porcelain.”
थोडक्यात काय तर छंद, विरंगुळा, पॅशन इ. बद्दलचे रोमॅंटीक आकर्षण खूप जुने आणि जगभर आहे.
पण त्या छंदाला काही दर्जा असावा की नाही? असल्यास तो कोणी ठरवावा? स्वांतःसुखाय म्हणून मला एखादा निरागस, harmless पण अत्यंत निर्बुद्ध असा छंद, विरंगुळा असला तर तो तितकाच थोर मानला जावा का? वर सांगितलेल्या कला, छंद यांच्या पंक्तीतला तो छंद नसेल तर? त्यासाठी आपले आयुष्य वेचावे का?
छंदाला उपयुक्तता असावी का? कलेला? कलेला उपयुक्तता आणि उपजिविका असली की त्याला commercial arts म्हणतात. तो झाला आर्थिक भाग. पण कलेला, छंदाला उद्देश, purpose असावा का? असलाच पाहिजे का?
एखादे सुंदर चित्र काही संदेश देऊ शकते, प्रेरणा देऊ शकते. पण तसेच ते पूर्णपणे abstract असू शकते. त्याचा काही purpose असायची गरज नाही. फक्त कलेसाठी कला!
हे कदाचित मान्य होईल. पण अत्यंत उथळ आणि सुमार कला किंवा छंद? समजा कोणालाही अपाय होत नाही अशी पण अर्थशून्य अशी कला किंवा छंद?
आता हेच उदाहरण घ्याः ११ भाषांतील ५०० गाणी उलटी म्हणणे सोप्पी गोष्ट नाही. कदाचित अनेक वर्षे त्यासाठी खर्च केली असतील. पण म्हणून ते भारी ठरते का? मला तर बातमी वाचल्यावर पहिला प्रश्न हाच पडलाः “हे सगळं उत्तम आहे…पण…का? विविध भाषांतील उलटी गाणी ऐकणे हा किती छळ असेल? आणि तसे गाणे हा त्याहून मोठा छळ!
काही लोकांना देश-विदेशाची नाणी गोळा करण्याचा छंद असतो. पण ती जर देशोदेशी हिंडल्यामुळे किंवा हिंडल्यावर मिळवली असतील तर थोडी तरी गंमत आहे. पण कुठेही न हिंडता वेगवेगळ्या लोकांकडून किंवा मार्गाने नाणी-नोटी यांचा संग्रह करणारेच जास्त असतात. त्यांना पाहून मला हाच प्रश्न पडतो – “पण…का?”.
मी नोकरीला लागल्यावर काही वर्षांनी २-३ देशांमध्ये जाऊन आलो होतो आणि तेव्हा त्या देशांची काही नाणी आणि नोटा आणल्या होत्या. त्यानंतर आमचे एक परिचित (त्यांना मित्र म्हणणे जिवावर येते) घरी आले. त्यांना परदेशाची नाणी आणि नोटा गोळा करण्याचा “छंद” होता जो त्यांनी २०-२५ वर्षे जोपासला होता. स्वतः ते बहुतेक पुणे जिल्ह्याच्या बाहेरही गेले नव्हते. पण तरीही लोकांकडे जाऊन वगैरे बऱ्यापैकी संग्रह जमवला होता. मीही त्यांना माझ्याकडची काही नाणी आणि नोटा (फुकट!) दिल्या. त्यांनी मला विचारलेः “तुला परदेशाची नाणी गोळा करण्याचा छंद नाहीये का?” मी म्हणालोः “नाही, मला स्वदेशाच्या सध्या चलनात असलेल्या नोटा जमवायचा छंद आहे…त्याही जास्त किंमतीच्या नोटा, आणि भरभरून…तुम्ही देताय का थोड्या?”
परदेशी नोटा संग्रह करण्याचा छंद निरर्थक आहे असे नाही (खरं तर तसंच आहे!) पण समजा मी असा कॅटलॅाग Amazon वरून विकत घेतला आणि दिवाणखान्यात ठेवला तर त्याला आपण महत्व देत नाही. स्वतः झटून कमावले तर कौतुक.
लिम्का बुक छाप रेकॅार्डस् ही अनेकदा अशी आचरट आणि अनाकलनीय असतात. ४ वर्षाच्या मुलाला ४० देशांच्या राजधान्या सांगता येतात. एखादा माणूस काचेचे बल्ब, ट्यूब खातो. एखादा केसानी ट्रॅक्टर किंवा कार ओढतो. कोणी एका मिनिटात ५० जिलब्या खातं. कोणी नाकानी पिपाणी वर गाणं वाजवतं (तेही कुठलं तरी देशभक्तीपर गाणं). एकानी कोणीतरी २०-२५ वर्षे मिश्या वाढवल्या होत्या (लॅाकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांनी त्या पराक्रमाची बरोबरी करायचा प्रयत्न केला). ह्या नागपूरच्या बाई ५०० गाणी उलटी म्हणू शकतात. असो. त्यांचे छंद…आपण कोण त्यांना नावं ठेवणारे (हे यथेच्छ टीका करून झाल्यावर म्हणायचे! 😎).
हे सगळे पाहिले की माझ्या मनात एक कल्पक विचार येतो. ह्या सगळ्यांना एकत्र करून एकाच वेळेस (किंवा एका मागोमाग एक) हे सगळे प्रकार करायला लावायचे. काय मजा येईल!
काय? तुम्हालाही तोच प्रश्न पडलायं ना…”पण…का?”
ता.कः हे वाचून मी अत्यंत निरस माणूस आहे …मला छंद, कला, विरंगुळा याबद्दल जराही आवड नाही…असे तुम्हाला वाटेल. पण तसे वाटल्यास तो तुमचा गैरसमज असेल. मला पण काही छंद, काही कला अवगत आहेत. मला रस्त्यावर टाकलेलं गुटख्याचं पाकीट पाचव्या मजल्यावरून पण दिसते. एखादा माणूस आता रस्त्यावर थुंकणार आहे हे काही सेकंद आधीच समजतं…तुम्ही मला ४ फोटो दाखवलेत तर त्यातले सिग्नल तोडणारे, वाहतूकीचे नियम न पाळणारे किंवा बेशिस्त पार्किंग करणारे कोण असतील हे अचूक ओळखता येतं. अशा अनेक सिद्धी मी कष्ट करून कमावल्या आहेत. ज्याचा मला त्रासच जास्त होतो. कारण अशा गोष्टींबद्दल बरेचदा काही करता येत नाही, आणि केल्यास भांडणे होतात. त्यापेक्षा ५०० गाणी उलटी म्हणणे जास्त चांगले!
Leave a Reply