माझा आवडता ऋतू …

This blog idea came to my mind after reading Ramana Sir’s blog “Favorite Time Of The Year.”and wanted to share my thoughts on the same. I prefer to write it in Marathi.

“तुझा सगळ्यात आवडता XXX कोणता?” ह्या साच्याचे प्रश्न आपण नेहेमीच ऐकतो. मी “arranged marriage” नावाच्या दिव्यातून अनेक वर्षे गेल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न खूपदा सोडवले आहेत.

तुझा आवडता लेखक कोण? असं एका मुलीला विचारल्यावर ती मला “कामुस” म्हणाली. मला कामूक ऐकू आलं. असावा एखादा लेखक कामूक लिहिणारा… म्हणून गप्प बसलो. 

तुझी आवडती फिल्म पर्सनॅलिटी कोण? – तिनी मला विचारलं. 

“सनी” – मी अनावधानाने बोलून गेलो. 

“ओह, तुलासुद्धा ऍक्शन फिल्म्स आवडतात? मला पण. पण मला सनी देओल पेक्षा अक्षय कुमार आवडतो”

“हुश्श… थोडक्यात बचावलो!  सनी लिओने हे जर तिने ओळखलं असतं तर तिथेच चारित्र्यहनन झालं असतं” – मी मनात म्हणालो 

असो. थोडक्यात “तुझा फेवरेट XXX कोण?” चा भरपूर अनुभव आहे मला. पण हळूहळू मला त्या प्रश्नातला फोलपणा समजायला लागला आहे. “ऑल टाईम बेस्ट” किंवा “टॉप ५ फेवरेट” पुस्तके, चित्रपट, माणसे, गाणी, प्रसंग इत्यादी कसे असू शकतात? किंवा ते कायमस्वरूपी कसे राहू शकतात?

तर हे आत्ता आठवायचे कारण म्हणजे “तुमचा फेवरेट सीजन, किंवा ऋतू, किंवा वर्षातला कालावधी कोणता” याबद्दल रमण सरांचा ब्लॉग वाचला. त्यांनी त्याचे उत्तर “पावसाळा” असे दिले आहे आणि पुण्यातल्या पावसाळ्याबद्दल लिहिले आहे. 

आपल्याला ऋतू, गाणं, प्रसंग इ. विशेष जवळचा वाटतो त्याचं कारण त्याच्याशी जोडलेली माणसे किंवा आठवणी – हेच असतं. 

म्हणजे, १५ ऑगस्ट हा माझ्यासाठी अति-संस्मरणीय दिवस आहे. पण तो स्वातंत्र्य दिन म्हणून नाही. तर काही विशेष वेगळ्या व्यक्ती, प्रसंगामुळे!

तसा माझा फेवरेट ऋतू असा नाहीये. म्हणजे कुठल्या ऋतूच्या काही विशेष आठवणी (इतर ऋतुंपेक्षा) नाहीयेत. पण हा, पुण्यातील पावसाळा मात्र मला हल्ली आवडत नाही. 

एक तर पुण्यात पाऊस तसा प्रचंड कधीच पडायचा नाही. म्हणजे मी गंमतीने मित्रांना म्हणायचो. पुण्यातला पावसाळा हा वृत्तप्रत्रातल्या हेडलाईननुसार चार गटात मोडतो. 

१. पुणेकर पावसाने सुखावले – ही अगदी पहिल्या पावसानंतरची हेडलाईन 

२. पुणेकरांची पावसाने तारांबळ – ही काही कालावधीनंतर अचानक आलेल्या पावसानंतरची हेडलाईन 

३. पुण्यात पावसाची संततधार – ही मुख्य पावसाळ्यात जेव्हा १-२ दिवस सतत पाऊस पडतो तेव्हाची हेडलाईन 

४. पुणेकरांना पावसाने झोडपले – ही साधारण वर्षातून एकदा किंवा दोनदा येणारी हेडलाईन. आणि मुंबई किंवा कोकणातला पाऊस बघितला तर ह्या “झोडपण्या”मध्ये तसा काही दम नसतो. 

माझ्या लहानपणी म्हणजे साधारण १९८० ते १९९५ या काळात पुण्यात वळवाचा पाऊस नियमितपणे पडायचा. साधारण एप्रिल किंवा मे मध्ये. अनेकदा गारा ही पडायच्या. गेल्या २५-३० वर्षात गारा पडणे तर बंदच झालंय पण पावसाळ्याचा नियमितपणादेखील डळमळीत झाला आहे. 

वेळी अवेळी येणारा पावसाळा मधेच परत उन्हाळा आणि हिवाळा ह्यावर मध्ये एक विनोद ऐकला होता. की पुण्यात आता एकच ऋतू असतो – “उन्हावसाळा”!

त्यामुळे कुठला ऋतू आवडतो – ह्यावर माझं उत्तर आहे – माझ्या लहानपणीचा पावसाळा… आणि त्याचं मुख्य कारणदेखील त्याकाळच्या आठवणी, ती माणसं हे आहे.

आता तसा पावसाळा नाही, आणि ती माणसं नाहीत…आहेत फक्त आठवणी! 

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑